पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षेत मास्क कॉपी प्रकरणात पोलिसाला अटक

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या परीक्षार्थी आणि संबधित पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी अटक केली आहे. येथील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत परीक्षार्थीने मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावून परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या परीक्षार्थीला औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यातील मदत करणाऱ्या कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी औरंगाबाद येथून संबंधीत पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. राहुल उत्तम गायकवाड (33, रा. मिल कॉर्नर, पोलीस वसाहत) असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. गणेश रामभाऊ वैद्य  (25, रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) असं अटक केलेल्या परिक्षार्थीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहितीप्रमाणे, 19 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील शिपाई पदाच्या 720 जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. हिंजवडी येथील एका परीक्षा केंद्रावर गणेश वैद्य याचा नंबर आला होता. सर्व परीक्षार्थींना तपासून परीक्षा केंद्रावर सोडत असताना पोलीस नाईक शशिकांत देवकांत यांच्या एक परीक्षार्थी निदर्शनास आला. त्या परीक्षार्थीच्या चेहऱ्यावर असलेला मास्क मोठा आणि जाड असल्याने पोलिसांनी त्याला हटकले. परंतु, आपले ओळखपत्र बॅगेत विसरले असल्याचं सांगून परीक्षार्थी वैद्य तिथून पळाला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा मास्क ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने तेथून पळ काढला.

दरम्यान, गणेश वैद्य याच्या मास्कमध्ये एक सिमकार्ड, बॅटरी आणि इतर तांत्रिक साहित्य सापडले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. यानंतर पोलिस तपासात पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड हा वैद्यला मदत करणार असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.