पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भोंग्यांच्या मागणीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. मंगळवारी (दि. 3) रमजान ईद असल्याने आपण कोणतेही पाऊल न उचलण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी बुधवार (दि. 4) पर्यंतचा अल्टिमेटम दिला. आज ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्या ठिकाणी हनुमान चाळीसा लावण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी 267 जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या आहेत.
शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह, मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधान सभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपाध्यक्ष बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील सभांमध्ये दिला आहे. त्यासाठी बुधवारचा अल्टिमेटम देखील राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
सर्व प्रकारच्या भोंग्यांना आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा अधिक आवाज असल्यास त्यावर कारवाई केली जाते. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात ध्वनी प्रदूषण सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. 3) रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांसह अतिरिक्त फौजफाटा रस्त्यावर उतरवण्यात आला होता. मशिदींबाहेर पहाटे पाच पासूनच पोलीस तैनात करण्यात आले होते. तसेच, मंदिर आणि मशिदींमधील अंतर कमी असलेल्या 63 ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आले होते. याठिकाणी दोन दिवस आधीपासूनच बॅरीगेटिंग करण्यात आले.
चिखली, भोसरी, चाकण आणि पिंपरी भागात मुस्लिम बांधवांची संख्या जास्त असल्याने या भागात शांतता कमिटीच्या बैठका घेऊन पोलिसांनी त्यांना एकोपा राखण्याबाबत सूचना दिल्या. राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमचे पडसाद शहरात उमटू नये यासाठी, पोलिसांनी मंगळवारी 267 जणांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीसा बजावल्या आहेत.