पुणे : पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बारामतीमधील एका पोलिस हवालदारास लाच प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. माणिक गदादे असं पोलिसाचं नाव आहे. त्यांची नेमणुक बारामती सेशन कोर्टात गार्ड म्हणून करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात कार्यरत असणार्या माणिक गदादे यांची काही दिवसांपुर्वीच बारामतीच्या सेशन कोर्टात गार्ड म्हणून डयुटी लावण्यात आली होती. दरम्यान, पुणे एसीबीच्या पथकानं काही वेळापुर्वी गदादे यांना लाच प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
माणिक गदादे हे पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांना काही दिवंसापुर्वी बारामती सेशन कोर्टात गार्डची डयुटी देण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून एक स्कॉर्पिओ ओढून आणली आणि स्कॉर्पिओ मालकाला त्या गाडीचा वापर दरोड्याच्या गुन्ह्यात झाल्याचं सांगितलं. स्कॉर्पिओ सोडून देण्यासाठी सर्वप्रथम गदादे यांनी 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. तडजोडीअंती 20 हजार रूपयांवर मांडवली करण्यासाठी माणिक गदादे तयार झाले.
कामकाजात अत्यंत हुशार असलेल्या माणिक गदादे यांना अॅन्टी करप्शन कारवाईचा संशय आल्याने त्यांनी लाच घेण्याचं टाळलं. पण, 20 हजाराच्या लाचेची मागणी केल्याचं अॅन्टी करप्शनच्या चौकशीत निष्पन्न झालं होतं. त्यामुळे पुणे अॅन्टी करप्शनच्या पथकानं आज (मंगळवार) दुपारी माणिक गदादे यांना ताब्यात घेतलं आहे.
बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती सेशन कोर्टातील पोलिसानं भलताच उद्योग केल्याची चर्चा सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये सुरू आहे.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.