पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश मोबाईलच्या ‘DP’ वरुन गायब

बदलीच्या चारच दिवसात झालेल्या बदलामुळे चर्चांना उधाण

0

पिंपरी : आयर्नमॅन, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारे, बेधडक अशी ओळख असणारे पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अश्यातच कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून झाली. सोशल मीडियावर ‘ऍक्टिव्ह’ असणारे आणि फोटो साठी सर्वांना ‘पोझ’ देणाऱ्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा फोटो पोलीस खात्यातील कर्मचारी अधिकाऱ्यापासून शहरातील अनेकांच्या मोबाईलवर ‘डीपी’ पाहायला मिळत होता.

राज्य पोलीस दलात चार दिवसांपूर्वी मोठे बदल करण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. या जागेवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारुन कामाला सुरुवात केली. याच दरम्यान कृष्ण प्रकाश हे ‘मॅरेथॉन’साठी परदेशात गेले होते. ते परदेशातुन येण्यापूर्वीच शिंदे यांनी पदभार घेतला.

कृष्ण प्रकाश यांच्या मुदतपूर्व बदलीसाठी शहरातील काही सामाजिक संघटनांनी वेगवेगळे प्रयत्न केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यपाल यांना निवेदन देऊन बदली रद्द करण्याची मागणी केली. कृष्ण प्रकाश यांनी स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत दाद मागितली अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर अनेक बदल केले. काही अधिकारी त्यांच्या जवळचे बनले. शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर त्यांना भेटून, त्यांच्यासोबत फोटो काढून स्वतःच्या मोबाईलवर ‘डीपी’ ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकांनी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले. कृष्ण प्रकाश यांचा चाहता वर्ग वाढू लागला. यामध्ये पोलीस कर्मचारी, अधीकारीही मागे नव्हते. अनेकांच्या मोबाईलचा डीपी, कार्यालयात फ्रेम केलेले फोटो पाहायला मिळत होते.

दरम्यान पोलीस आयुक्तपदी अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चारच दिवसात अनेकांच्या मोबाईलच्या डीपीवरून कृष्ण प्रकाश यांचा फोटो गायब झाल्याचा दिसत आहे. विशेषतः शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ठराविक नागरिक यांनी आपला ‘डीपी’ बदलला आहे. कृष्ण प्रकाश यांना मानणारे, चाहते असणाऱ्या पोलिसांनी एवढ्या लवकर बदल केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.