शिंदे – ठाकरे सत्तासंघर्षाच्या देखाव्याला पोलिसांनी नाकारली परवानगी

0

पुणे : दिल्लीपासून-गल्लीपर्यंत चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या ठिणग्या आता थेट बाप्पांच्या दारी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्याच एक प्रकार म्हणजे पुण्यातील गणेशोत्सवात सादर होणाऱ्या शिंदे – ठाकरे सत्तासंघर्षाच्या देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे.

काेराेनामुळे दाेन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदाच्या वर्षी गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी गणेश मंडळांनी सुरू केली आहे. मात्र, पुण्यातील गणेश मंडळांच्या देख्यांवरून सातत्याने चर्चा रंगू लागली आहे.

पुण्यातील बुधवार पेठेतील नरेंद्र मित्र मंडळ राज्यातील सत्ता संघर्षाचा देखावा यंदाच्या गणेशोत्सवात साकारणार हाेते. त्याकरिता बुधवार पेठेतील मूर्तीकार प्रदीप तारू यांच्याकडे मंडळाने रितसर पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मूर्ती साकारण्यासाठी ऑर्डर दिली. त्यानंतर शिल्पकाराने संबंधित हुबेहूब मूर्ती तयार ही केल्या. परंतु मंडळाने देखाव्याबाबतची माहिती पाेलिस ठाण्यात दिली. त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून वादाचा प्रसंग उभा राहू शकत असल्याचे कारण देत त्यास विराेध केला. त्यामुळे गणेश मंडळाने हा देखावाच रद्द करून दुसरा देखावा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

देखावा रद्द करण्याच्या प्रकाराबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. अशाचप्रकारे पुण्यातील काेथरूड परिसरातील एका गणेश मंडळाने अफजल खानाचा वध देखावा सादर करण्याची पाेलिसांकडे मागणी केली हाेती. परंतु त्यास सुरुवातीला पाेलिसांनी परवानगी नाकारली हाेती. अखेर राजकीय दबावानंतर सदर देखाव्यास परवानगी देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.