सातारा : पोलिसांच्या वेशात येऊन, सराफाच्या दुकान गोळीबार करुन दुकान लुटणार्या दरोडेखोरांचा पोलिसांनी पाठलाग केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडे जखमी झाले आहेत. हा प्रकार फलटण जवळील वडले गावात घडला. वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने एका दरोडेखोराला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण तालुक्यातील वडले हे गाव फलटण-शिंगणापूर रस्त्यावर फलटणपासून नऊ किमी अंतरावर आहे. 26 ऑक्टोबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळशी ते मोरगाव रस्त्यावर सराफ व्यावसायिकाची दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकत त्यांच्याकडील 11 लाख 66 हजारांचे दागिने अज्ञातांनी जबरदस्तीने चोरुन नेले होते.
याबाबत अमर रंगनाथ कुलथे (रा. मोरगाव) या सराफ व्यावसायिकाने यासंबंधी फिर्याद दिली होती. 25 ऑक्टोबरला दसर्याच्या मुहुर्तावर पळशीत सोने- चांदी विक्रीचे दुकान टाकणार्या कुलथे याना उदघाटनाच्या दुसर्याच दिवशी लुटण्यात आले होते. या घटनेचा वडगाव पोलिसांकडून गेल्या महिनाभरापासून तपास सुरु आहे.
दरम्यान, सपोनि लांडे हे सहकार्यांसह रविवारी तपासाला फलटण तालुक्यात गेले होते. या प्रकरणातील संशयित माने नावाचा व्यक्ती वडले गावात असल्याची माहिती त्याना मिळाली होती. लांडे यांनी यापूर्वी फलटणमध्ये काम केले आहे. त्यामुळे या भागाची चांगली माहिती त्यांना आहे. वडले येथे गेल्यावर गावठी पिस्तुलातून त्यांच्यावर संशयिताने गोळीबार केला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर म्हणाले, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. छर्याच्या बंदुकीतून हा गोळीबार झाला असल्याची माहिती मिळत आहे.