पुणे : औंध परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत मध्यरात्रीच्या सुमारास शिरलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून सुरक्षारक्षकाला डांबले आणि सोसायटीतील चार फ्लॅट फोडले. परंतु पाचवा फ्लॅट फोडण्याचा तयारीत असताना याची माहिती शेजारील नागरिकांना लागली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर गस्तीवर असणारे पोलिस घटनास्थळी आले परंतु चोरांना पकडण्याऐवजी चोरट्यांना पाहून तेच पळून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही काय झाला आहे. औंध मधील शैलेश टावर या सोसायटीत 28 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी गोविंद हिरामण यादव (वय 44) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 28 डिसेंबरच्या पहाटे शैलेश टावर या सोसायटीमध्ये चार चोरटे शिरले. यातील दोघांनी सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून पकडले आणि त्याचे तोंड दाबले. तर उर्वरित दोन चोरटे सोसायटी मध्ये शिरले. त्यांनी चार फ्लॅट फोडले. परंतु पाचवा फ्लॅट फोडण्याचा तयारीत असताना याची कुणकुण शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागली. त्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून याची माहिती दिली.
त्यानंतर तत्काळ गस्तीवर असणारे पोलीस कर्मचारी या सोसायटीमध्ये दाखल झाले. नेमके याच वेळी चोरटे सोसायटीतून बाहेर पडत होते. त्यानंतर बाहेर पडणाऱ्या त्यांना पाहून प्रवेशद्वारावर आलेले पोलीस पळून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर झालेल्या या सर्व प्रकाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे.