राकेश भरणे टोळीतील गुन्हेगारास पोलिसांनी केले स्थानबद्ध

0

पिंपरी : वाकड परिसरातील कुप्रसिद्ध राकेश भरणे टोळीतील गुन्हेगार अनिल तुकाराम मोहिते याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहेत.

अनिल तुकाराम मोहिते (वय 44, रा. बेला व्हीस्टा सोसायटी, दत्त मंदिराजवळ, वाकड) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी अनिल मोहिते हा कुख्यात गुन्हेगार राकेश भरणे टोळीचा सदस्य आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात लोखंडी रॉड, पिस्टल यांसारखी हत्यारे घेऊन खून, खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून जागेचा ताबा घेणे, दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरून नाहक त्रास देणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत.

सन 2013 पासून त्याने वाकड आणि पिंपरी परिसरात पाच गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्ह्यांचा वाढता आलेख पाहून वाकड पोलिसांनी मोहिते याच्यावर एमपीडीए नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला. त्याला मंजुरी देत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अनिल मोहिते याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मोहिते याला 24 फेब्रुवारी रोजी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.