महिन्याभरासाठी पोलिस निरीक्षक कंट्रोल रूमशी ‘संलग्न’

0

पुणे : माल वाहतूक करणार्‍या ‘पिकअप’ वर कारवाई न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना बंडगार्डन वाहतूक विभागाच्या  पोलीस कर्मचार्‍याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. आपल्या हाताखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण नसल्याने पोलीस खात्याची बदनामी होणारी घटना घडल्याने बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात महिन्याभरासाठी बदली करण्यात आली आहे.

पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हा आदेश काढला आहे. ए. डी. दळवी असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली होती. बंडगार्डन वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार दिलीप दत्तू फुंदे (३४) याने मालवाहतूक करणारी पिकअप अडविली. त्यांच्या गाडीचा इन्शुरन्स व रजिस्ट्रेशन संपल्याचे दिसून आले. त्यामुळे फुंदे याने त्यांची गाडी अडवून ठेवली. त्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी व ‘आरटीओ’ कडे ते वाहन न पाठविण्यासाठी ७ हजारांची लाच मागितली. ‘लाच लुचपत’कडे आलेल्या तक्रारीची पडताळणी करताना फुंदे याने तडजोड करुन ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताना शुक्रवारी रात्री फुंदे यांना सापळा रचून पकडण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक ए. डी. दळवी यांच्या अधिपत्याखाली बंडगार्डन वाहतूक विभागात कार्यरत होता. आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपले त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने पोलीस खात्याची बदनामी होणारी ही घटना घडली.

या घटनेमुळे दळवी यांना 1 महिन्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली असल्याचे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, यापुर्वीच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर संबंधित पोलिस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे एका पोलिस निरीक्षकावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केलेली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.