औरंगाबाद : दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस निरीक्षकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.16) सायंकाळी जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैभव ज्वेलर्स येथे करण्यात आली आहे.
विलास दिनकरराव निकम (57) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 44 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
विलास निकम हे मंठा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या विरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल असलेल्या पुनर्विचार याचिकेवर से (म्हणणे) सादर करण्यासाठी विलास निकम यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पंचासमक्ष पडताळणी केली असता विलास निकम यांनी दोन लाख रुपयांची लाच मागून दीड लाख रुपये घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. दीड लाख रुपयांपैकी 50 हजार रुपये स्विकारताना पोलीस निरीक्षक निकम यांना मंगळवारी सायंकाळी सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. विलास निकम यांच्यावर मंठा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.