मुंबई : अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी NIA ने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, रियाझ काझी यांना अटक केलेली आहे. दरम्यान आता या प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलातील क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनिल माने यांनाही अटक केली आहे.
दरम्यान, अंबानी स्फोटक प्रकरणासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील माने यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अंबानी स्फोटक प्रकरणात अडकलेल्या मुंबई पोलिस दलातील अधिका-यांची संख्या हळूहळू वाढत आहे. या प्रकरणात वाझेला 13 मार्चला तर रियाझ काझीला 11 एप्रिल रोजी अटक केली होती.
प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी रोजी स्फोटक ठेवलेली गाडी आढळली होती. त्यानंतर हा दहशतवादी कट असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर 5 मार्चला मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला.
त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. सुरुवातीला आत्महत्येचे चित्र असलेला हा मृत्यू नंतर हत्या असल्याचे NIA च्या तपासात स्पष्ट झाले. तपासात संपूर्ण कट सचिन वाझे याने रचल्याचे उघडकीस आल्याने NIA ने त्याला अटक केली. वाझेसोबतच रियाझ काझीला देखील एनआयएने अटक केली आहे. विक्रोळीतील एका नंबर प्लेटच्या दुकानातील सीसीटीव्ही फूटेज नष्ट करत गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यात वाझेला मदत केल्याचा प्रमुख आरोप काझीवर आहे. दरम्यान आणखी कोण कोण या कटात सामील आहे, याचा NIA कसून तपास करत आहे.