पुणे ः पिंपरी-चिंचवड आयुक्तालात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) धडक कारवाई करत २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात एका कर्मचाऱ्याला पकडले आहे. संबंधित कारवाईमध्ये वरिष्ठ कर्मचारी असल्याची चर्च आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. कारवाई सुरू असल्याने अद्याप सविस्तर माहिती बाहेर आलेली नाही.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर एसीबीची कारवाई सुरू आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याने सर्वांचे मोबाईल काढून घेण्यात आले आहेत. या एका निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याची चर्चा आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने २० हजारांची लाच मागितली होती. यासंंबंधी एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती.
तक्रार दाखल झाल्यामुळे साडे आठच्या सुमारास एसीबीने सापळा रचून ही बेधडक कारवाई केली. कारवाई करण्यात आलेला कर्मचारी हा सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याची चर्चा आहे. या कारवाईत आणखी एका अधिकाऱ्याचे नाव घेतले जात आहे. त्याची चौकशी केली जात आहे. अद्याप पूर्ण खात्री करण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये लाच घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एसीबीची कारवाईही वारंवार होताना दिसत आहे.