पिंपरी : मुंबईतील झोपडपट्टीमधून चालणाऱ्या नामांकित कंपन्यांचे जसे व्हर्लपूल व सॅमसंग यांचे बनावट कस्टमर केअरचा
पोलिसांनी पर्दाफार्स केला आहे. मुंबई, अहमदाबाद व पुणे येथील नागरिकांना फसवणारे रॅकेट हिंजवडी पोलीस ठाणे व गुन्हा शाखा युनिट -4 पथकाने उध्वस्त केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
रफिउद्दीन उर्फ रफिक चौधरी (28, रा. जाधववाडी, चिखली, मूळ रा. ग्राम रूदलापूर, पोस्ट बांसी, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), मोहम्मद अब्दुल (21, रा. पवारवस्ती, दापोडी मूळ रा. ग्राम बनियानी, पोस्ट बनियानी तेहसील तांडा, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. तसेच, आरोपी अशोक माली (31), जय प्रकाश माली (27), पारस माली (21, सर्व रा. जय भवानी सोसायटी रूम नंबर 5, सोसायटी नंबर 5, पिंपरी पाडा, मालाड ईस्ट मुंबई मूळ रा. राजस्थान) या आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.
उपायुक्त भोईटे म्हणाले, की या प्रकरणात एकूण 9 आरोपी आहेत. त्यापैकी ५ जणांना अटक केली आहे. इतर 4 आरोपींमध्ये 1 महिला व 3 अल्पवयीन आहेत. याबाबत अरुण डुंबरे (43, रा. वाकड) यांनी गिभे शाखा युनिट 4 कडे तक्रार दिली. त्यांच्या घरातील खराब झालेल्या व्हर्लपुल कंपनीचे रेफ्रिजरेटरच्या दुरुस्तीसाठी इंटरनेटवर सर्च केल्यावर त्या ठिकाणी व्हर्लपुल कस्टमर केअर नावाने असलेल्या एक टोल फ्री क्रमांकावर त्यांनी कॉल केला. त्या कॉलवर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तो व्हर्लपुल कस्टमर केअरमधून बोलत असल्याचा बनाव केला. फिर्यादीच्या घरी रफिक व फिरोज नावाचे दोन इसम पाठवून त्यांनीसुद्धा ते अधिकृत व्हर्लपुलचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवले. तसेच, त्यांनी फिर्यादीच्या घरातील रेफ्रिजरेटरच्या दुरुस्तीचे काम केल्याचा बनाव करून फिर्यादीकडून 3, 250 रुपये इतकी रक्कम घेऊन बनाव इन्व्हॉईस देऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
त्यावरून रफिउद्दीन चौधरी व मोहम्मद फिरोज अब्दुल यांच्या विरोधात भा. द. वि. कलम 419, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेंद्र गाढवे यांनी 28 जुलै रोजी आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडे तपास केल्यानंतर बनावट कस्टमर केअर बाबत माहिती मिळाली. या बनावट कस्टमर केअर व त्यांच्या मास्टरमाईंडचा शोध लावण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस उप निरीक्षक महेंद्र गाढवे हे तपास टीम सोबत रफिकला घेऊन मालाड मुंबईला गेले. तेथे जाऊन पोलीस पोलिसांच्या मदतीने पिंपरी पाडा झोपडपट्टीमध्ये शोध घेऊन झी 24×7 कस्टमर केअरचा शोध घेऊन छापा टाकला. तेथे काम करणाऱ्या 4 मुली व 2 पुरुष यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 7 अँड्रॉइड मोबाईल तसेच 17 छोटे मोबाईल व वेगवेगळ्या नोंद वह्या, रजिस्टर, व कॉम्पुटर असा एकूण 1,14,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यामध्ये 7 मोबाईल हे टोल फ्री क्रमांक असलेले मिळाले.
अशोक माली, जयप्रकाश माली, पारस माली या तीन आरोपींना 29 जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यांना 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला होता.
ही कामगीरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले, प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, मच्छिद्र पंडित, सोन्याबापू देशमुख, सुनील दहिफळे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.