पुणे : पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने आणि तरुणीच्या आईने पोलीस चौकीत गोंधळ घातल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी तरुणीवर पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवार (दि.2) दुपारी दोन ते चार या दरम्यान कर्वेनगर पोलीस चौकीत घडला.
21 वर्षीय युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस नाईक सुष्मा कल्याण घोळवे (33) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्या दामिनी मार्शल ड्युटीवर आहेत. रविवारी दुपारी आरोपी तरुणी तिची आई आणि भाऊ हे कर्वेनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आले होते. आरोपी तरुणी तक्रार न देता वारजे चौकीत गेली. वारजे चौकीत तिची तक्रार नोंदवून घेऊनही कर्वेनगर चौकीत येऊन ‘पोलीस माझे काहीही वाकडे करु शकत नाहीत’ असे म्हणत तिने आणि तिच्या आईने आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
यावेळी फिर्यादी यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी तरूणीने अश्लिल शिवीगाळ करत फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच चौकीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांनाही अर्वाच्च भाषेत ‘ए तु हो बाजुला’ असे म्हणत त्यांच्या गणवेशावर लावलेला ‘स्टार लावलेला बेल्ट’ तोडला. पोलीस करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले या करीत आहेत.