पिंपरी : आजारपणाचे कारण देत सुट्टीवर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने गणवेशात जाऊन पुण्यातील एका हॉटेल मध्ये पैसे मगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी त्या पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे याला निलंबित करण्यात आले होते. कुरकुटे याला यापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर त्याला सेवेतून निलंबित केले होते. पुन्हा त्याला सेवेत घेण्यात आले. सध्या तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला सलग्न आहेत.
आजारपणाच्या रजेवर असताना त्याने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंढवा येथे जाऊन एका हॉटेल व्यवसायिकाकडे जाऊन पैशाची मागणी केली. याबाबत मुंढवा पोलिसांनी कळविल्यानंतर त्याला दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे.
मिलन कुरकुटे हा हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना 24 जानेवारी 2020 रोजी त्याने एका प्रकरणात मागितलेली लाच घेताना त्याला वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली. त्यानुसार 5 फेब्रुवारी 2020 रोजी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी त्याला निलंबित केले. काही महिन्यांपूर्वी त्याला पुन्हा पोलीस सेवेत घेऊन नियंत्रण कक्षाशी त्याला सलग्न करण्यात आले होते.
21 ऑगस्ट 2021 पासून तो आजारपणाच्या रजेवर गेला आहे. 24 ऑगस्ट रोजी त्याने मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल कार्निव्हल येथे गणवेशात जाऊन हॉटेल मालक व मॅनेजरशी हुज्जत घातली. तसेच त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. याबाबत मुंढवा पोलिसांकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना कळविण्यात आले. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याला खात्यातून बडतर्फ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.