पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. वानवडी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. याबाबतचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारा आणखी एक खटला लष्कर न्यायालयात दाखल झाला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर हा खटला दाखल झाला आहे. या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा खटला आहे. यापूर्वी लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी देखील फिर्याद दिली होती. त्यानुसार खटला दाखल आहे. या दोन्ही अर्जांवर पाच मार्च रोजी निकाल होणार आहे. या खटल्यात देखील कोणतीही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नाही.
या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, यासाठी आम्ही हा खटला दाखल केला आहे, अशी माहिती भाजपा वकील आघाडीच्या अध्यक्ष ॲड. र्इशाना जोशी यांनी दिली.
पोलिसांकडून कोणतीही कारवार्इ होत नाही. पोलिसांनी अद्याप स्वतःहून तक्रार दाखल केली नाहीत. ते कोणाची वाट वाहत आहे हे समजत नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत. आमच्या अर्जावर आज युक्तिवाद झाला आहे. याबबाची पुढील सुनावणी पाच मार्च रोजी होणार आहे.
ॲड. र्इशाना जोशी, अध्यक्षा, भाजपा वकील आघाडी