पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात न्यायालयात खटला दाखल
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास करण्याची मागणी
पुणे : पूजा चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणारा एक खासगी खटला येथील लष्कर न्यायालयात आज दाखल झाला आहे. न्यायालयाने गुन्हा दाखल करून घेत पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणात नाव असलेल्या मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
खटला दाखल करून घेण्यासाठी लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी लष्कर न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांच्या न्यायालयात हा खटला दाखल झाला आहे. या खटल्यावर पाच मार्च रोजी निकाल होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र तरी देखील अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पूजा यांना कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी आम्ही हा खटला दाखल केला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.
महाआघाडातील एका मंत्र्यासोबत असलेल्या संबंधातून पूजा हिने आत्महत्या केली, अशी चर्चा आहे. मात्र न्यायालयात खटला दाखल करताना कोणत्याही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नाही, असे ॲड. ठोबरे यांनी सांगितले.
कोट –
पुजाचा मृत्यू संशयास्पद असून त्याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास मृत्यू बाबतचे पुरावे आरोपींकडून नष्ट करण्याची दाट शक्यता आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना आदेश होणे गरजेचे असल्याचे दाखल खटल्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात तरुणीची हत्या अथवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिस प्रशासनाबाबत त्वरित तपास होणे आवश्यक होते. परंतु, या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने तपासकामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे.
ॲड. विजयसिंह ठोंबरे, अध्यक्ष लीगल जस्टिस सोसायटी