मुंबई : टिक टॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून शिवसेनेच्या मंत्र्यांचे नाव घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वर्षा निवासस्थानी बोलावून घेतलं. गुप्ता यांनी वर्षावर येऊन पूजा आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आत्महत्या कशी झाली? प्रत्यक्ष साक्षीदारांच्या नोंदी, मेडिकल रिपोर्ट आदींची गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी गुप्ता यांना ऑडिओ क्लिपबाबतची माहितीही विचारली. या क्लिप खऱ्या आहेत का? त्यातील आवाज मंत्र्याचा आहे का? या क्लिपमधील संभाषणाचा अर्थ काय निघतो? आदी माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच पुणे पोलिसांनी काय तपास केला आहे त्याचा अहवाल ही पाहिलेला आहे.