बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याचा शोध घेतला जात आहे.
पूजा अरूण राठोड ही महिला 6 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती. तिचा वॉर्ड नंबर 3 होता. डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसत आहे. परंतु याबाबतची वस्तुस्थिती वेगळी आहे असा खळबळजनक खुलासा खुद्द डॉ. श्रीकांत वराडे यांनी केला आहे.
वराडे म्हणाले, त्या महिलेवर डॉ. रोहिदास चव्हाण यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले आणि दुपारी तिला घरी सोडण्यात आलं होतं. पूजा अरूण राठोड (22) या महिलेला मी पाहिलं देखील नाही. परंतु मी 5 फेब्रुवारी रोजी युनिट 2 साठी म्हणजेच सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी (6फेब्रुवारी) सकाळी 9 वाजेपर्यंत कार्यरत होतो. दरम्यान माझं युनिट सुरू असताना युनिट 1 चे डॉ. रोहिदास चव्हाण यांनी पहाटे 4.34 वाजता
संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं. आणि तिला सखी या कक्षात डॉ. चव्हाण यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. डॉ. चव्हाण यांचं युनिट 1 हे 6 फेब्रुवारीच्या सकाळी 9 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशीच्या (7 फेब्रुवारी) सकाळी 9 पर्यंत सुरू होतं. या महिलेच्या उपचाराशी माझा काहीही संबंध नाही.
दरम्यान शॉर्ट केस रिपोर्टमध्ये रुग्णाचं नाव पूजा अरूण राठोड (22) असून तिच्यावर जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत उपचार करण्यात आले. पहाटे 4.34 मिनिटांनी तिला युनिट 2 मध्ये वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दाखल करण्यात आलं. या रिपोर्टवर युनिट 2 चे प्रमुख डॉ. श्रीकांत वराडे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे.