मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेताच ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन उद्धव ठाकरे यांना धक्का देत सरकार स्थापन केले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारने केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देत उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.
29 जूनला ठाकरे सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. यानंतर औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची बदली करण्यात आली होती.
सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती केली होती. तर पांडे यांना औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासकपद देण्यात आले होते. तसेच दिपा मुधोळ मुंडे यांना सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नियुक्त केले होते.
यावर एकनाथ शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यामुळे पुढील आदेश निघेपर्यंत आस्तिक कुमार पांडे औरंगाबादचे आयुक्त राहणार आहेत. तर अभिजित चौधरी यांना सांगलीला जावे लागेल.