पुणे : महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने आज पहाटेपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. लोणीकंद ते चाकण दरम्यान महापारेषणाती मोठी वीज वाहिनी आहे. त्यामध्ये बिघाड झाल्याने पहाटेपासून वीज बंद आहे. पुढील काही तासात वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.
वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात हडपसर, कोंढवा, कात्रज, धायरी, स्वारगेट, बाणेर, कोथरूड शिवाजीनगर रस्ता रोड फाटा रोड आजचा भाग वडगाव शेरी चंदन नगर टिंगरे नगर येरवडा यासह सर्वच भागातील वीजपुरवठा पहाटेपासून खंडित झालेला आहे पिंपरी-चिंचवड शहरातील पहाटेपासून वीज गेलेले आहे.
महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.
अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.
महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.