नवी दिल्ली ः ”आज मी जो काही आहे तो शेतकऱ्यामुळेच आहे. शेतकऱ्यांनी मला निवडून दिलं आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे शेतीविषयक कायदे सोयीचे नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी मला निवडून दिलं आहे, त्याच शेतकऱ्याला सरकारनं फसवलं आहे, अशा परिस्थितीत पद्मविभूषण पुरस्कार माझ्याजवळ ठेवण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे मी तो परत करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे मत अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी मांडले आहे.
यापूर्वी कृषी कायद्यांच्या विरोधात अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारवर निशाणा साधन प्रकाश सिंह बादल यांनी आपला ‘पद्मविभूषण’ परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारविरुद्ध मागील आठवडाभरापासून सुरू असलेले कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. ३५ शेतकरी संघटनांमधील पाच सदस्यांची टीम केंद्र सरकरबरोबर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, हे आमंत्रण शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी फेटाळले. कृषी कायदा रद्द करावा, याच भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्नदेखील निष्फळ ठरला असल्याचे दिसत आहे.