जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत पुण्यातील प्रतीक साहू हा विद्यार्थी देशात सातवा

0

पुणे : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. या परीक्षेत पुण्यातील प्रतीक साहू हा विद्यार्थी देशात सातवा आला आहे. पुण्यातील इतरही अनेक विद्यार्थ्यांनी अ‍ॅडव्हान्समध्ये घवघवीत यश मिळवून आयआयटीत प्रवेश निश्चित केले आहेत. यंदा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा कट ऑफ मात्र मोठ्या प्रमाणावर घसरला असून, गेल्या 16 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका कमी कट ऑफ जाहीर झाल्याचे आयआयटी प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवापूर्वी आयआयटी अ‍ॅडव्हान्स परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला शहरातील दीड हजारांहून अधिक मुले बसली होती. जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याने अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी यंदा कमी विद्यार्थी बसले होते. त्यामुळे साहजिकच जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकालही घटला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा घटणार आहे.

यंदा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आणि कॉमन मेरिट लिस्टमध्ये रँक मिळवण्यासाठी आवश्यक असलेला कट ऑफ मोठ्या प्रमाणावर उतरला होता. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 360 पैकी केवळ 55 गुणांची आवश्यकता होती. टक्केवारीत विचार केला, तर हे प्रमाण केवळ 15.28 टक्के होते.

विषयांचे कट ऑफही उतरले असून, विद्यार्थ्याने 120 पैकी 5 गुण मिळवले, तरीही तो उत्तीर्ण होऊ शकत होता. विद्यार्थ्यांची गुण मिळवण्याची क्षमता कमी झाल्याने ही स्थिती ओढवली. कोरोनामुळे दोन वर्षे जे ऑनलाइन शिक्षण झाले त्याचाही फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याची माहिती प्रवेश परीक्षा तज्ज्ञांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.