पिंपरी : अहमदनगर येथील साथीदाराच्या मदतीने नगर येथील पोळ हॉस्पिटलमध्ये दरोडा टाकण्याचा कट पोलिसांनी उधळला आहे. पिंपरी चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने सहा जणांना अटक केली आहे. मंगळवारी (दि.18) गहुंजे गाव येथून अटक केली आहे.
पुनीतकुमार विवेक शेट्टी (29, रा.वाकड), आफताब मेहबुब शेख (21, रा. वाकड), रुपेश राजेश गायकवाड (21, रा.चिंचवड), शुभम लक्ष्मण दाते (19, रा.चिंचवड), सचिन बबन जायभाये (24, रा.शेवगाव. अहमदनगर), साहिल हरिदास शिंदे (20, रा.वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना अहमदनगर येथील अमरापूर फाट्यावरील पोळ हॉस्पिटलवर दरोडा टाकायचा होता. तेथील डॉक्टरला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा कट त्यांनी रचला होता. त्यासाठी परिसराची पाहणी देखील झाली होती. साधारण रविवार ते मंगळवार या कालावधीत हा कट रचण्यात आला होता. त्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची जुळवा-जुळव आरोपी करत होते.
साहिल हा गहुंजे गाव येथे जिवंत काडतुसे घेण्यासाठी आला. तेथे काडतुसे न मिळाल्याने त्याने जगन सेनानी (पुर्ण नाव माहिती नाही) याला फोन पे द्वारे पुनितकुमार याच्या मोबाईलवरून 20 हजार रुपये पाठवले. या साऱ्या भनगडी सुरु असताना दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांना याचा सुगावा लागला. पोलिसांनी त्वरीत कारवाई करुन आरोपींना जेरबंद केले व आरोपींचा दरोड्याचा कट उधळला. तपास पोलीस करत आहेत.