“लसीकरणानंतर काही दुष्परिणाम झाल्यास उपचाराची पूर्वतयारी ठेवा”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या सूचना
मुंबई : “करोना लसीकरणामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. जर लसीकरणानंतर काही दुष्परिणाम झाल्यास त्यावर उपचार करण्याची तयारी ठेवावी आणि आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे”, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या.
करोना लसीकरणाचा आढावा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण केले. तसेच या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
“ब्रिटनमधून मुंबईत आलेल्या प्रवाशांना विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते. मात्र, मागील काही दिवसांपासून असे लक्षात आले आहे की, इतर राज्यातील विमानतळावर उतरून प्रवासी देशांतर्गत प्रवास करत महाराष्ट्रात येतात. परिणामी, त्यांचा मागोवा काढणं शक्य होत नाही. केंद्राने अशा प्रवाशांना संबंधित विमानतळावरच विलगीकरणात ठेवावे”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.