महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान

0

नवी दिल्ली : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी  डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (दि. 28) पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा यात समावेश आहे.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित दिमाखदार सोहळयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, प्रसिद्ध पार्श्व गायक सोनू निगम आणि आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पद्म पुरस्कार वितरणाच्या आज दुस-या टप्प्यात 2 पद्मविभूषण, 5 पद्मभूषण आणि 53 पद्मश्री  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कला क्षेत्रातील उल्लेखनीय  योगदानासाठी  किराणा  घराण्याच्या  ज्येष्ठ  गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या मानाच्या नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून डॉ अत्रे यांचा भारतीय अभिजात संगीतात नावलौकिक आहे. ख्याल गायकीसोबतच ठुमरी, दादरा,गझल, उपशास्त्रीय संगीत,नाटय संगीत, भजन व भावसंगीत अशा संगीत प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा देश-विदेशात प्रसार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे लेखनही त्यांनी केले आहे. कलाश्रेत्रातील योगदानासाठी त्यांना यापूर्वी  पद्मभूषण (2002) आणि पद्मश्री (1990)  या नागरी सन्मानानेही  गौरविण्यात आले आहे.

लावणी सम्राज्ञी ज्येष्ठ लोकगीत गायिका सुलोचना चव्हाण यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या 75 वर्षांपासून त्या  गायनक्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीमती चव्हाण या, 1946  पासूनच  हिंदी चित्रपटांमध्ये गायन करू लागल्या. ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये गायनास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी भाषांमध्येही भजन, गझल असे विविध प्रकारचे गायन केले आहे.

प्रसिध्द पार्श्वगीत गायक सोनू निगम यांनाही  कला  क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. लॉर्ड ऑफ कॉर्ड्स नावाने प्रसिध्द असलेल्या सोनू निगम यांनी हिंदी, मराठीसह एकूण 10 भाषांमध्ये 4 हजार गीत गायिली आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता आज या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी वीणा तांबे  यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. तांबे यांनी आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात गेल्या साडेतीन दशकांपासून अधिक काळ कार्य  केले. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवरही संशोधन केले आहे. त्यांनी लाखो रुग्णांवर उपचार केले. दूरचित्रवाणीहून त्यांनी हजारो कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाचा प्रचार- प्रसार केला. त्यांनी आयुर्वेदावर 50 हून अधिक पुस्तके लिहीली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.