पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर

0

मुंबई : राज्यात भाजप आणि शिवसेनेतील राजकीय वाद विकोप्याला पोहचला आहे. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (ता. १४ जून) अनेक महिन्यांनंतर एकाच मंंचावर एकत्र येत आहे. मुंबईतील राजभवनामधील क्रांतिकारी गॅलरीचे उद्‌घाटन उद्या मोदींच्या हस्ते होणार आहे, त्या कार्यक्रमास मुख्यमंत्री ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता या दोघांचे एकत्र येणे महत्वाचे आणि चर्चेचे ठरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मोदी यांच्या हस्ते सकाळी देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर राजभवनावर गॅलरी उद्‌घाटनाचा दुसरा कार्यक्रम असणार आहे.

विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडले होते. त्या भुयारामध्ये एक गॅलरी स्थापन करण्यात आली, त्यामध्ये चाफेकर आणि सावरकार बंधू यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. या गॅलरीचे उद्‌घाटन उद्या दुपारी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही, अशी चर्चा सुरु असतानाच ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे, त्यामुळे अनेक महिन्यांनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.