पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या देहू नगरीत ते शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण देहूनगरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तयार झाली आहे. दुपारी एक ते दोन या कालावधीत पंतप्रधान देहूत येणार आहेत. आपल्या या दौर्यात ते मंदिरातील सोहळा आणि वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांची संवाद साधणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
देहू गाव येथे उभारलेल्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन होईल. त्यानंतर इंद्रायणी नदी तीरावर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नरेंद्र मोदी वारकऱ्यांच्या वेषात येतील. विठुरायाचे दर्शन घेऊन ते शिळा मंदिराचे लोकार्पण करतील. यादरम्यान देवस्थानच्या वतीने तुकोबांची पगडी आणि उपरणे देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमासाठी बावीस एकर जागेत बंदिस्त सभागृह तयार केले जात आहे. एकाच वेळी 40 हजार वारकरी बसतील अशी तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. यात बंदिस्त सभागृहात सुरुवातीला अध्यक्षांचे मनोगत आणि त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण होईल. त्याच ठिकाणी नरेंद्र मोदी सोहळ्याला उपस्थित असलेल्या वारकर्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने सुरक्षा यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान आल्यानंतर मंदिराच्या आवारात अनुपस्थित असेल सोहळ्याच्या ठिकाणी आसन व्यवस्था कशा प्रकारे असेल याचा आढावा घेतला जातोय.