पुणे : पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवरपंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबर अखेर पुण्यात येत आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे. या अनुषंगाने प्रशासकीय तयारी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडे तयार झाले आहेत. या दोन्ही महापालिकांसह पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही येत्या जानेवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा होतोय. पुणे मेट्रोचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे.
त्याचबरोबर, पंतप्रधानांच्या दौऱ्यातच महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु, या माहितीस दुजोरा मिळू शकला नाही. ओबीसी आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने याबाबत स्पष्टता नसल्याचे म्हटले जातं आहे. दरम्यान, हिंजवडी मेट्रोसाठी केंद्राने बाराशे कोटी रुपये दिलेत. या मेट्रोचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते या डिसेंबर अखेर होऊ शकते. या 2 कार्यक्रमांशिवाय स्वतंत्र कार्यकर्ता मेळावा घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारात पंतप्रधानांना गुंतवू नये, अशी देखील चर्चा सुरु आहे.