नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. दुरदृष्यप्रणालीद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत कोरोना स्थिती, लहान मुलांचे लसीकरण, इंधन दरवाढ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे देशापुढे काय आव्हाने उभी राहिली आहेत याबाबत चर्चा करण्यात आली.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे. ओमिक्राॅन आणि त्याच्या विविध व्हेरीयंटमुळे कशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली, हे आपण युरोपीय देशांमध्ये पाहिलेच, त्यामुळे खबरदारी म्हणून सर्व पात्र लहान मुलांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी शाळांमध्ये विशेष मोहिम राबवण्याचे आवाहन मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे.
संपुर्ण देश महागाईने त्रस्त झाला आहे. वाढत्या इंधनाच्या किंमती सामान्यांना वेठीस धरत आहेत. हाच मुद्दा बैठकीत उपस्थित करत पंतप्रधान मोदी यांनी बिगर भाजपशासित प्रदेशांवर चांगलाच निशाणा साधला. मोदी म्हणाले, महाराष्ट्र, केरळ, आसाम, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी डिझेलवरील दर कमी करावा आणि सामान्य जनतेला यातून दिलासा द्यावा. देशाच्या हितासाठी इंधनाचे दर केव्हाच कमी करायला पाहिजे होते, पण आतातरी दर कमी करा असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी सुनावले. महागाईविषयी बोलताना रशिया-युक्रेन युद्धावर सुद्धा चर्चा झाली. या युद्धामुळे देशापुढे काय आव्हाने उभी राहिली आहेत याबाबत बोलताना पुरवठा कशाप्रकारे प्रभावित झाला हे यावेळी सांगितले
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी कोविड संदर्भात घेतलेली ही 24 वी बैठक होती. या बैठकीत इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या या बैठकीत प्रामुख्याने कोरोना संबंधीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, मिझोराम, कर्नाटक, हरियाणा या पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यांत राबवलेल्या प्रभावी अंमलबजावणीबाबत कशा पद्धतीने राबवली ते सांगितले.