शेतकरी आंदोलकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रत्युत्तर
विविध राज्यातील छोट्या शेतकऱ्यांशी साधला संवाद
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून सुरू असलेल्या आणि दिवसेंदिवस तीव्र होत जाणाऱ्या पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रत्यु्त्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वेगवेगळ्या राज्यातील छोट्या परंतु शासकीय योजनांना लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. जाणीवपूर्वक कृषी कायद्यांसदर्भात प्रश्न विचारून आंदोलकांना उत्तर देण्याच प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केला. तसेच विरोधकांवरही हल्ला चढविला.
पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या निमित्ताने मोदी यांनी शुक्रवारी छोट्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, हरियाणा, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या सात राज्यांतील दोन ते पाच एकर जमीन असणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांचे अनुभव मोदींनी दूरचित्रवाणीद्वारे ऐकले.
अरुणाचल प्रदेशमधील शेतकऱ्याने बेंगळूरुमधील खासगी कंपनीला आल्याचे पीक विकत असल्याची माहिती दिली. खासगी कंपन्या छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतील, हा दिल्लीच्या सीमांवरील आंदोलक शेतकरी संघटनांचा गैरप्रचार असल्याचे मोदी म्हणाले. देशात ८८ टक्के म्हणजे १० कोटींपेक्षा जास्त छोटे शेतकरी असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार छोट्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली.
महाराष्ट्रातील गणेश भोसले या शेतकऱ्याशी साधला संवाद
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करणाऱ्या लातूरमधील गणेश राजेंद्र भोसले यांचाही मोदींनी भाषणात उल्लेख केला. देशातील दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत असून तो खासगी व सहकारी क्षेत्राच्या आधारे केला जातो, असेही मोदी म्हणाले. या अनुभवाचे मोदींनी केले.नवे कायदे छोट्या शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचेही सांगत दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन प्रामुख्याने पंजाब व हरियाणातील मोठ्या शेतकऱ्यांचे असल्याचे मोदींनी सांगितले.