नवी दिल्ली : भारतातील कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पाठिंबा देत काळजी व्यक्त केली. यानंतर आता मोदी सरकारने जस्टिन ट्रूडो यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत कॅनडाचा हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचं म्हटलं आहे.
जस्टिन ट्रूडो यांनी आमचा शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. कॅनडाचे पंतप्रधान आणि इतर नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तांकडे आपली नाराजी व्यक्त केली. तसेच भारताच्या अंतर्गत विषयांमधील कॅनडाचा हस्तक्षेप अजिबात मान्य नाही, असं सांगितलं
मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (4 डिसेंबर) आपली भूमिका स्पष्ट करत कॅनडातील नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर वाईट परिणाम होईल, असा इशारा दिला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नुकताच भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
ते म्हणाले होते, “आम्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबांसोबत आहोत. या शेतकऱ्यांविषयी आम्हाला काळजी वाटत आहे. आपल्या अधिकारांसाठी शांततापूर्ण आंदोलनात कॅनडा नेहमीच तुमच्यासोबत आहे. आमचा चर्चेवर/संवादावर विश्वास आहे. आम्ही शेतकऱ्यांची बाजून भारतीय अधिकाऱ्यांसमोर ठेऊ. आपण सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे.”
भारतीयवंशाचे कॅनडाचे खासदार रुबी सहोटा आणि टिम उप्पल यांनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे.