मुंबई : बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याचे नावाने लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या टोळीने लोकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून साहित्य जप्त केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सायबर सेलच्या महिला पोलीस उप निरीक्षक अनिता चव्हाण यांच्याकडे बजाज फायनान्स कंपनीकडून फसवणूक झाल्याचं तक्रारी अर्ज आले होते. त्यावरून तांत्रिक विश्लेषण केले. ही टोळी डोंबिवली, जिल्हा- ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली. नांदेड पोलीस आणि मुंबई येथील मानपाडा पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला.
दिनेश मनोहर चिंचकर (रा. न्यू साईनाथ कॉलनी, रामदास वाडी, कल्याण), रोहित पांडुरंग शेरकर (28, रा. काकाच्या ढाब्याजवळ, कल्याण पूर्व) हे १८ ते २० कर्मचारी नोकरीस ठेऊन उत्तर प्रदेश राज्यातील काही साथीदाऱ्यांचे मदतीने बनावट कॉल सेंटर चालवीत असताना मिळून आले आहेत. त्यांनी मोबाईल क्रमांकाचा ऑनलाईन डाटाबेस मिळवून नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त मोबाईल क्रमांकाच्या डाटाबेस मधील क्रमांकावर फोन करण्यास लावून बजाज फायनान्स कंपनीमार्फत लोन मिळवून देतो असे सांगून लोकांना लोन पास करणे करिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून फसवणूक केली आहे.
सदर ठिकाणाहून 26 मोबाईल, एक लॅपटॉप, अनधिकृतरित्या मिळवलेला मोबाईल क्रमांकाचा डाटाबेस, इतर कागदपत्र असे एकूण रुपये 1,10,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर बनावट कॉल सेंटर स्थापन केलेला इसम व मॅनेजर म्हणून काम पाहणारा इसम यांना अटक करण्यात आली असून सदर ठिकाणी नोकरी करणारे कर्मचारी यांचे कडे अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त जय जीत सिंग, सहआयुक्त मेकला, अपर पोलीस आयुक्त येनपुरे, पोलीस उपआयुक्त पाटील, पोलीस अधीक्षक शेवाळे, नांदेड सहाय्यक पोलीस आयुक्त कदम यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा, ठाणे घटक -३ कल्याण चे व इतवारा पोलीस ठाणे नांदेड चे पोलीस पथकाने केली.