नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापलेला आहे. अशाप्रकारे लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची सुद्धा जबाबदारी घ्या, अशी घणाघती टीका खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ते आज लोकसभेच्या चर्चेत बोलत होते. सध्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटनेही डोकं वर काढल्याने देशात चिंता आणखी वाढली आहे.
कोरोना विरुद्ध मोदी सरकारने कशाप्रकारे काम करण्याची गरज आहे हे खासदार कोल्हे यांनी लोकसभेत सांगितले. यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही युद्धात काही नियम असतात, ज्याद्वारे युद्ध जिंकता येते.
यावेळी युद्धाचे सेनापती अर्थात पंतप्रधान मोदी यांनी सर्व संकटात पुढे उभे राहून सामना करणे आवश्यक आहे.
मृत्यूसारख्या गोष्टींची जबाबदारी घेऊन त्यावर उपाययोजना करण्यावरही भर दिला पाहिजे, असे कोल्हे म्हणाले.
खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केल्यानंतर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोवरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. खासदार सुळे यांनी यावरून प्रश्न उपस्थित केला की, प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो असल्यास राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो का नाही?