पिंपरी : व्यवसायिक आनंद उनावणे अपहरण, खून प्रकरण उघडकीस आणण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. कंपनीतून काढलेल्याचा राग मनात धरून एकाने मित्रांच्या मदतीने कट रचून हा गुन्हा केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
उमेश सुधीर मोरे (28, रा. काळेवाडी), दीपक धर्मवीर चंडालिया (34, रा. रावेत), सागर दत्तात्रय पतंगे (28, रा. कटफळ, ता. बारामती), बाबू उर्फ तुळशीराम नथुराम पोकळे अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. तसेच आरोपींनी खंडणीपोटी घेतलेले सोन्याचे दागिने कोणत्याही पावतीशिवाय खरेदी करणारे राकेश राजकुमार हेमणानी (27, रा. पिंपरी), कपिल ग्यानचंद हासवाणी (30, रा. पिंपळे सौदागर), प्रवीण नवनाथ सोनवणे (22, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) या तिघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रभू पुजारी हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फ्रेंड्स फंड इंडिया चीटफंड कंपनीचे कार्यकारी संचालक आनंद साहेबराव उनावणे (42, रा. नर्मदा बिल्डिंग, नवीन म्हाडा वसाहत, मोरवाडी, पिंपरी) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याबाबत विष्णू साहेबराव उनावणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू पुजारी हा उनावणे यांच्या चिटफंड कंपनीत मुख्य रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या वर्तणुकीवरून उनावणे यांनी त्याला एक वर्षापूर्वी कामावरून काढले होते. त्याचा पुजारी याच्या मनात होता. त्यावरून त्याने उनावणे यांना मारण्याचा तसेच त्यांच्याकडून मिळेल तेवढे पैसे उकळण्याचा कट रचला. त्याने अन्य चार आरोपींना विश्वासात घेतले.
3 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री उनावणे यांच्या राहत्या घरापासून त्यांचे अपहरण केले. त्यांना खंडणी मागून लाखो रुपयांची खंडणी घेतली. उनावणे यांना हिंजवडी, ताम्हिणी घाट मार्गे महाड येथे नेले. प्रवासादरम्यान आरोपींनी कारमध्ये उनावणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. उनावणे यांचा मृतदेह दगडाने ठेचून भोराव गाव, महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरून फेकून दिला. उनावणे यांचा मृतदेह 6 फेब्रुवारी रोजी नदी पत्रात आढळला.
पोलिसांनी आरोपी दीपक चंडालिया याला हरियाणा येथून अटक केली. आरोपी उमेश, बाबू आणि सागर यांनाही पोलिसांनी सापळा लावून अटक केली. पोलिसांनी एकूण 39 लाख 5 हजार 678 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कटटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, सहाय्यक निरीक्षक गणेश लोंढे, सुधीर चव्हाण, प्रमोद भांडवलकर, राजु काकडे, शेखर कुलकर्णी, शांताराम हांडे, अमोल चौगुले, दत्तात्रय निकम, महेश शिंदे, अनिल गायकवाड, विवेकानंद सपकाळे, भिसे, रमिजा गोलंदाज, पोलीस नाईक शहाजी धायगुडे, सुहास डंगारे, ओंकार बंड, उमेश वानखेडे तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक शाकिर जिनेडी, महेंद्र पाटील, कर्मचारी सुनिल कानगुडे, संदीप पाटील, शैलेश मगर, अशोक गारगोटे तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार, कर्मचारी वेताळ, राऊत, राऊत, जमीर तांबोळी यांनी केली आहे.