पिंपरी : खासगी फ्लॅटमध्ये परदेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर चार परदेशी तरुणींची सुटका केली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने केली आहे.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कुंटणखाना चालविणार्या निलेश नरेश गोस्वामी (२२, रा. नेहरुनगर, पिंपरी) याला अटक केली आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल विलासराव सोळंके यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
सांगवीतील सृष्टी चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालयाकडे जाणार्या रोडवरील शिव मल्हार या बिल्डिंगच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक प्रमुख अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर काल दुपारी येथे छापा घातला. तेव्हा तेथे चार परदेशी तरुणी आढळून आल्या. त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी निलेश गोस्वामी याला अटक करुन त्यांच्याकडून ८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.