औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध समाज माध्यमांवर करण्यात येतो आहे. ‘समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?’ असं वक्तव्य त्यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये केलं आहे. याचा महाविकास आघाडी आणि इतरांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
याच बरोबर त्यांनी शिवाजी महाराजांना कमी लेखतोय असं नाही. पण ज्या माणसाला गुरु नाही, त्याची महती उरत नाही, असंही वक्तव्य केलं आहे. समर्थ रामदासांच्या कृपेनं आम्हाला राज्य मिळालं असं शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं. त्याच बरोबर गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो, असंही समर्थ रामदासांना शिवरायांनी म्हटलं होतं, असं सुद्धा राज्यपालांनी यावेळी म्हटलंय.
या देशात गुरु अशी परंपरा आहे, की ज्याला सद्गुरु मिळाला म्हणजे सगळं काही मिळालं आणि सद्गुरु नाही मिळाला तर काहीच मिळालं नाही. समर्थांच्या शिवाय शिवाजीला कोण विचारेल तरी का?’ असं त्यांनी म्हटलंय. गुरुदक्षिणा म्हणून या राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं, असंही राज्यपालांनी दावा केला आहे.
दरम्यान, राज्यपालांनी माफी मागावी अथवा बदनामीचा दावा दाखल करु, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही आणि विधान मागे घेतलं नाही तर त्यांच्या अब्रुनुकसानीचा दावा करु, असं त्यांनी म्हटलंय.
2013 चा औरंगाबाद खंडपीठाने असा निर्णय दिला होता की, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांच्या गुरु-शिष्य परंपरेचा दूरदूर पर्यंत काहीही संबंध येत नाही. एकप्रकारे असं वक्तव्य करुन त्यांनी औरंगाबाद खंडपीठाचा अवमानच केला आहे. जर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही तर त्यांच्यावर आम्ही अब्रुनुकसानीचा दावा केल्याशिवाय राहणार नाही.