मुंबई ः केंद्र सरकार आणि शेतकरी कायद्याविरोधात पंजाब-हरियाणाचे शेतकरी आंदोलनाने उग्र रुप घेतले आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले की, ”आज शेतकरी आणि सरकारची स्थिती भारत-पोकिस्तानप्रमाणे झाली आहे. जसं निवडणुकीच्या वेळी नेते शेतकऱ्यांकडे मत मागायला जाता तशाप्रकारे त्यांच्या समस्यांवरही चर्चा करा.”
अण्णा हजारे पुढे म्हणाले की, ”शेतकरी अंहिसेच्या मार्गाने आंदोलन करतो आहे. त्यांच्याकडून हिंसा घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे शेतकरी पाकिस्तानी नाहीत. सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. इतक्या दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतो आहे, हे देशाचं दुर्दैव आहे”, असे म्हणत अण्णा हजारे यांनी केंद्रावर निशाणा साधला.
”शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला तो योग्य नाही. भारत-पाकिस्तानच्या संघर्षाप्रमाणे शेतकऱ्यासोबत घडत आहे. ते काही देशाचे शत्रू नाहीत. त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढायला हवा” असेही अण्णा हजारे म्हणाले.