पुण्याहून सहा वाजून दोन मिनिटांनी सुटणारी लोकल (01484) खडकी रेल्वे स्थानका वर बंद पडली. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खडकी रेल्वे स्थानकावर लोकल थांबवण्यात आली. दरम्यान पुण्याहून दुरुस्ती पथक बोलावण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. या प्रकारात लोकल दीड तासांहून अधिक वेळ उशिरा धावत आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे-लोणावळा मार्गावरील दोन लोकल सुरु करण्यात आल्या. सकाळच्या वेळी दोन तर सायंकाळच्या वेळी दोन लोकल गाड्या सुरु करण्यात आल्या. यामुळे पुणे-लोणावळा मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पुण्यातून सुटणारी लोकल खडकी स्थानकावर आल्यानंतर तांत्रिक कारणामुळे बंद पडली. त्यामुळे लोकल खडकी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली. झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पुण्याहून एक पथक बोलावण्यात आले. या कामासाठी तब्बल दीड तासांहून अधिक वेळ लागल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत थांबावे लागले. दरम्यान दुसरी लोकल गाडी बोलावण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.