पिंपरी चिंचवड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे आणि लोणावळ्यातील वरसोली टोलनाक्यावर पिंपरी चिंचवडवासियांना टोलमाफी मिळावी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु होती. अखेर टोल हटाव संघर्ष समितीच्या मागणीला एमएसआरडीसी आणि आयआरबीकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावर एम एच १४ पासिंग असणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय कृती समितीने सोमाटणे फाटा येथील टोलनाका अनधिकृत असून टोल आकारणी करुन मावळवासियांची लूट होत असल्याची तक्रार करत आयआरबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, रविवारी मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही टोल हटाव संघर्ष समितीकडून देण्यात आला होता. तद्नंतर पोलिसांतर्फे संबंधितांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी टोल हटाव संघर्ष समिती प्रमुख किशोर आवारे, सुरेश चौधरी, सचिन भंडलकर, गणेश खांडगे, अमोल शेटे, सुनील पवार यांच्यासह आयआरबीचे वामन राठोड एमएसआरडीसीचे वाहतूक नियमन अधिकारी दिलीप शंकरराव सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी तळेगावच्या सोमाटणे भागातील विविध पक्षांचे प्रतिनिधींनी कृष्णकुंज येथे भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत याप्रश्नी चर्चा केली होती.