पुणे महानरपालिका : राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र लढण्याचा बैठकीत निर्णय

0

पुणे : भाजपला रोखण्यासाठी राज्यात सत्तेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार हे निश्चित झाले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या पहिल्याच बैठकीत आघाडीसाठी जागा वाटपासह विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आघाडीच्या घट स्थापनेला पुण्यातून मुहूर्त मिळाला आहे.

राज्यात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आता महापालिका निवडणुकीही एकत्र लढविणार का याबाबत उत्सुकता आहे. पुण्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही पक्षांची पहिली प्राथमिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी आणि सेनेच्या शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकित महापालिका निवडणूकीसाठी आघाडीबाबत या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत प्रामुख्याने कोणतेही मतभेद न करता भाजपला रोखण्यासाठी पालिका निवडणुकीत आघाडी करण्यावर एकमत झाले. सेनेच्या उपस्थित पदाधिकार्‍यांनी त्यासाठी सकारात्मकता दर्शविली.

जागा वाटप करताना सेनेला सन्मानजनक पध्दतीने जागा मिळाव्यात अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीनेही आघाडी दोन्ही पक्षांसाठी सन्मानजनक पध्दतीनेच होईल असे आश्वासन यावेळी दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान आता राष्ट्रवादी आणि सेना एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने काँग्रेस स्वतंत्र लढणार का आणि लढल्यास या आघाडीचा आणि भाजपाचा काँग्रेस कसा सामना करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या बैठकीत जागा वाटपाबाबतही प्राथमिक चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने दोन्ही पक्षांच्या विद्यमान जागा कायम ठेवायच्या. तर गत पालिका निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर ज्या पक्षाच्या उमेदवार होता, ती जागा त्या पक्षाला सोडण्यावर या बैठकीत एकमत झाले. दरम्यान शिवसेनेने किमान 45-50 जागांची अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.