पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर मोक्का अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत फरार असणाऱ्या गायकवाड बाप-लेकास पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड आणि नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आय.टी.आय. रोड, औंध) अशी अटक केलेल्यांची नाव आहे. नानासाहेब गायकवाड हे मोठे उद्योजक आहेत तर गणेश गायकवाड हा एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी होता. त्याला राजकीय पक्षानं पक्षातून काढून टाकलं आहे. छळ, मारहाण, पिस्तूलाचा धाक दाखवून खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गायकवाड बाप-लेकासह इतरांविरूध्द मोक्काअंतर्ग कारवाई केली होती. मोक्काअंतर्गत कारवाई केल्यानंतर काही तासातच गणेश आणि नानासाहेब गायकवाड यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गायकवाड यांना अटक करण्याचे आदेश यापुर्वीच दिले होते.