रेल्वे प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा

चोरीच्या 11 गुन्ह्यात झाला कारावास

0

पुणे : रेल्वे पोलिस असल्याचे सांगत प्रवाशांकडून रोख रक्कम, मोबाईल, पाकीट, पर्स तपासण्यासाठी घेण्याचा बहाणा करून ते चोरणाऱ्यास लोहमार्ग न्यायालयाने सात महिने चार दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. राऊत यांनी हा निकाल दिला.

 

 

न्यायालयाने तब्बल अकरा गुन्ह्यांमध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यापैकी चार फसवणुकीच्या गुन्ह्यात एकूण आठशे रुपये दंड ठोठावला आहे. अविनाश भारत भुर्लेकर (वय २९, रा. सिंदनकेरा, जि. बिदर, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एस. अंतरकर, पोलिस उपनिरीक्षक के. बी. मुन्नास्वामी, पोलिस नाईक डी. एम. बोरनारे, पोलिस हवालदार ए. एस. कांबळे आणि ए. के. दांगट यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

 

 

चोरी झाल्याबाबत काही प्रवाशांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या होत्या. त्याचा तपास करून पोलिसांनी भुर्लेकरला अटक केली आणि त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस नाईक के. बी. गुरव, हेड कॉन्स्टेबल बी. ओ. बमनाळीकर, पोलिस कॉन्स्टेबल जी. ए. शिंदे यांनी मदत केली. दंड न भरल्यास दोन दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला निकाल सांगण्यात आला.

 

 

प्रवासी बोगीत जात असताना करायचा चोरी :
रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवर आलेल्या, तसेच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भुर्लेकर रेल्वे पोलिस असल्याची बतावणी करायचा. रेल्वे प्रवासादरम्यान तुमच्याकडे किती पैसे आहेत, हे तपासावे लागते. तसेच मोबाईल चेक करायचा आहे. त्यासाठी एक अर्ज भरून द्यावा लागतो, अशी बतावणी तो प्रवाशांना करायचा. त्यानंतर तपासणी करण्याच्या बहाण्याने प्रवाशांचे पैसे, मोबाईल, पाकीट चोरायचा. तसेच रेल्वेच्या बोगीत प्रवेश करताना पाकिटे, पर्स, मोबाईल चोरल्याचे प्रकार त्याने केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.