पुणे : पाणी भरण्यासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख यांनी तिघांना सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विठ्ठल सदाशिव शिंदे, बाबू गणपत इंगुळकर, रवींद्र लक्ष्मण राजणे (तिघेही रा. सुरवड, ता. वेल्हा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
संबंधित तरुणी ही तिच्या मामेबहिणीसह हात पंपावर पाणी भरण्यासाठी आली होती. यावेळी, आरोपींनी तिचा विनयभंग केला. तसेच त्या घटनेच्या काही दिवस आधी संबंधित मुलगी महाविद्यालयात जात असताना पाठलाग करून तिला त्रास देण्यात आला होता. यावेळी, गावामध्ये बैठक बोलावून वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तरीही हा प्रकार न थांबल्याने मुलीने २३ मार्च २०१६ रोजी आरोपींविरोधात वेल्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानुसार, आरोपींविरोधात विनयभंगांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अॅड. नितीन कोंघे यांनी काम पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी सात साक्षीदार तपासले. दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये संबंधित तरुणीला देण्यात यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.