राजमाता जिजाऊ महाविद्यालयात ही आढावा बैठक पार पडली . यावेळी माजी आमदार विलास लांडे , पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेचे उपाध्यक्ष व शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर , कार्याध्यक्ष यश साने , सचिव व माजी नगरसेवक विनायक रणसुभे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे , माजी नगरसेवक धनंजय आल्हाट , उदय पाटील , तात्या सपकाळ , विलास नढे , राजेंद्र छेडे , उत्तम आल्हाट , आतिश बारणे , सुधाकर भोसले , अमर फुगे यांच्यासह शास्तीकराने त्रस्त झालेले शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते . माजी आमदार विलास लांडे म्हणाले , ” शास्तीकर हा गेल्या एक दशकापासून पिंपरी – चिंचवडकरांच्या मानगुटीवर बसलेला झिजिया कर आहे . तो रद्द व्हावा आणि शास्ती माफीची शहरातील नागरिक कित्येक वर्षांपासून मागणी करत आहेत . परंतु , नागरिकांच्या मागणीला दाद दिली जात नाही .
शास्तीकराच्या थकित बिलावर नागरिकांना दंड आकारला जात आहे . त्यामुळे शास्तीकराचा थकित आकडा फुगला आहे . हा आकडा पाहून शास्तीकर वसुलीच्या नोटिसा आलेल्या नागरिकांच्या पोटात गोळा आलेला आहे . पोट भरण्यासाठीच संघर्ष करण्याची वेळ आलेल्या नागरिकांनी लाखोंच्या घरात आलेले शास्तीकर भरायचे कोठून हा प्रश्न आहे . त्यामुळे या नागरिकांच्या मनात शास्तीकराबाबत प्रचंड चीड निर्माण झालेली आहे . या नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा , शास्तीकराचे भूत कायमचे नष्ट व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेने एका संघटनेच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला सर्व पिंपरी चिंचडकरांनी साथ द्यावी. शास्तीकर कायमस्वरुपी रद्द होत नाही आणि कर माफ केले जात नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला .