पंचतारांकित हॉटेल मधील वेश्या व्यवसायावर छापा; चार मुलींची सुटका

0

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापेमारी करून उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या ठिकाणच्या चार महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे.

याप्रकरणी वेश्या व्यवसायातील दलाल रवींद्रकुमार तुलशी यादव (वय – २२ रा. डधुंदा, जि. चतरा, झारखंड, सध्या रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, येरवडा), आनंदकुमार सुक्कर यादव (वय -२४, रा. डधुंदा, जि. चतरा, झारखंड, सध्या रा. साईनगर सोसायटी, कल्याणीनगर, येरवडा), अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल (वय ३०, रा. बानसूर, जि. अलवर, राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एक 36 वर्षीय, 33 वर्षीय आणि दोन 25 वर्षीय तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात संबंधित पंचतारांकित हॉटेल आहे. दलालाने या हॉटेलमध्ये भाड्याने खोली घेतली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांची संपर्क करून त्यांना याठिकाणी बोलवण्यात येत होते. तसेच, परराज्यातील तरुणींना​​​​​​​पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात येत होते. मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्यात येत होता.

या ऑनलाइन वेश्या व्यवसायाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस कर्मचारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधला आणि हॉटेलमध्ये सापळा रचला. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातून तीन दलाल तसेच दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमित जमदाडे, इरफान पठाण, इम्रान नदाफ आदींनी ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.