पुणे : पिंपरी चिंचवड येथील पंचतारांकीत हॉटेल मध्ये काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या भोजपुरी चित्रपट मधील अभिनेत्री व मॉडेल यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाकड परिसरात एका उच्चभ्रू हॉटेलवर छापा टाकून एक भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेलची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी बनावट ग्राहकांमार्फत संशयित आरोपीकडे मुलींबाबत विचारणा केली. दलालाने वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेल येथे रूम बुक करण्यास सांगितल्या.
त्यानंतर सदर ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुममध्ये आल्यानंतर अचानक पोलिसांनी छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन मुलींना ताब्यात घेवून विचारपूस केली. त्यावेळी दलाल हा जवळच आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून दोन पिडीत महिला व एक दलाल सापडल्याने त्यांना ताब्यात घेतले.
आरोपीवर वाकड पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 45 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन पिडीत मुलींची सुटका पोलिसांनी केली आहे. एक पिडीत मुलगी भोजपुरी अभिनेत्री व एक पिडीत मुलगी ही मॉडेलिंग करत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. याबाबत पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे , पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे)डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सौळक, विजय कांबळे, पोलीस अमलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांनी केली आहे.