अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापे; माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला निशाणा

0

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी आणि ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लखीमपूर खीरी हत्याकांडाची तुलना जालीयनवाला बाग हत्याकांडाशी केल्यानेच ही कारवाई राजकीय द्वेषातून झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. आता या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून राष्ट्रवादीवर टिका केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्राप्तीकर विभागाची कारवाई पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

1,050 कोटी रुपयांच्या दलालीचे पुरावे सापडले
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आयकर विभागाने जी छापेमारी (IT Raids) केली आहेत, ती दोन प्रकारची आहे. पहिल्या दिवशी झालेल्या कारवाईत 1,050 कोटी रुपयांच्या दलालीचे पुरावे सापडल्याचे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. माध्यमांनाही त्याच गांभीर्य अजून समजलेले नाही. ही 1050 कोटींची दलाली बदल्यांसाठीची आहे, टेंडरसाठीची आहे. असे देशात पहिल्यांदाच होत आहे.

साखर कारखाने खरेदीसाठी वापरला काळापैसा
फडणवीस म्हणाले, काल ज्या पाच साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या. हे कारखाने खरेदी करण्यासाठी केलेली प्रक्रिया चूकीची असल्याने ही कारवाई झाली. साखर कारखाना खरेदी करताना तुम्ही तो लाचेच्या किंवा काळ्या पैशाने त्याबद्दल फक्त टॅक्स भरून तो पांढरा पैसा आहे असं भासवून खरेदी करू शकत नाही.

कारखाना खरेदी करताना तो योग्य पैशानेच खरेदी करावा लागतो. मात्र, या पाचही प्रकरणात तसे झाले नव्हते. याबाबत तक्रारी होत्या आणि त्यानंतरच प्राप्तीकर विभागाने कारवाई केली आहे.

ड्रग्जप्रकरणावर केले हे वक्तव्य
आर्यन खान ड्रग्जप्रकरणी फडणवीस म्हणाले की, ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. याचे राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडले त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस होता. त्याचे नाव आम्ही घेत नाही कारण की, तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.