पुणे : सामाजिक सुरक्षा विभागामार्फत विशेष रात्रगस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत पोलिसांनी उत्तमनगर पोलिस हद्दीत दांगट पाटील नगर, एनडीए रोड, शिवणे येथे पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये पोलिसानी 21 जणाना अटक केली असून 1 जण फरार आहे.
महिला पोलिस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 8 मे रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास दांगट पाटील नगर, एनडीए रोड, शिवणे येथे देवेश इंटरप्राइझच्या मागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये छापा टाकला. या इमारतीच्या तळमजल्याच्या सुमारे दोन हजार स्क्वेअर फुटच्या पार्किंग स्लॉटमध्ये हा पत्त्यांचा जुगारी अड्डा सुरू होता. या पार्किंग लॉटमध्ये अनधिकृत लाइट घेऊन 15 टेबल आणि 65 खुर्च्या लाऊन बरेच दिवस जुगार खेळला जात होता.
सदर कारवाईमध्ये पोलिसांनी अड्डयाचा मालक बाळू सीताराम मराठे (51 वर्षे, रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) याच्यासोबत आणखी 20 जणांना अटक केली आहे. त्यातील बाळासाहेब दांगट याची अटक बाकी आहे. अशा एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत अटक झालेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख 30 हजार 580 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 35 हजार 700 रुपयांचे जुगाराचे सामान तर, 82 हजार 100 रुपयांचे एकूण 20 मोबाइल जप्त केले आहेत. या 22 जणांवर उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्र. 55/2022, महाराष्ट्र राज्य जुगार प्रतिबंधक कायदा 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक सुरक्षा सामाजिक विभाग, पोलिस उपनिरीक्षक पंढरकर, पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, निलम शिंदे, मनीषा पुकाळे, अश्विनी केकाण, इरफान पठाण यांनी केली.