उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे

0

मुंबई : मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून आज गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत. अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित साखर कारखाने आणि कंपन्यांवर आज सकाळपासून आयकर विभागाची पथके तपास करत आहेत. दरम्यान अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आयकर विभागाच्या कारवाई झाल्याचे म्हटलं आहे. या कारवाईत बहिणीच्या घराची देखील आयकर अधिकाऱ्यांनी झडती घेतल्याचे म्हटलं आहे.

अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरे आणि कार्यालयांची आयकर अधिकाऱ्याकडून झडती घेतली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटलं आहे. यात जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, आंबलिक शुगर , पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं बोलले जाते.

नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगर येथेही पथक पोहचले आहे. कारखान्याचे प्रवेशद्वार बंद करून तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

दोन महिन्यांपूर्वी ईडीनं जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता सील केली होती. या कारवाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तरं दिली होती. ‘जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळं कारखान्याचं संचालक मंडळ ईडीच्या कारवाईला न्यायालयात आव्हान देईल,’ असं अजित पवार यांनी कारवाईनंतर माध्यमांना स्पष्ट केल होतं.

जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव करताना मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. नुकताच सोमय्या यांनी कारखान्याला भेट दिली आणि सभासदांशी संवाद साधला होता. ईडी पाठोपाठ आज आयकर विभागाने छापे टाकून तपास सुरु केला आहे. सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले असून तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.